अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News :- उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सातव्या व शेवटच्या टप्प्यासाठी ५४ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही तसेच सोनभद्र जिल्ह्यात हे मतदान होत आहे.
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा जागांचा समावेश आहे. दरम्यान उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते.
सत्ताधारी भाजप तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाच्या दृष्टीने हा शेवटचा टप्पा महत्त्वाचा आहे. जातींशी निगडित असलेल्या छोटय़ा पक्षांची भूमिका यामध्ये निर्णायक आहे.
शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असलेला भाग समाजवादी पक्षाचे प्रभावक्षेत्र असलेला आहे. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपने या ५४ पैकी मित्रपक्षांनी २९ जागा जिंकल्या होत्या.
तर समाजवादी पक्षाला ११ व बहुजन समाज पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या. शेवटच्या टप्प्यातील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे रोड शो आयोजित केला होता.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही समाजवादी पक्षासाठी वाराणसीत प्रचारसभा घेतली होती. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी चार दिवस वाराणसीमध्ये होत्या.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सभा घेतली. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनीही येथे प्रचार केला होता. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.