अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक अनेक कुटुंबीयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. पोटनिवडणूक आटोपून घरी परतलेल्या शिक्षकाने आपल्यासोबत कोरोना विषाणूही घरी नेला.
घरी गेल्यानंतर दोन दिवसांत त्यांना विविध शारीरिक समस्या जाणवू लागल्या.निवडणुकीतील तणावामुळे होते असेल, असे त्यांना वाटले.पण कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पहिल्या दोन दिवसांतच त्याचे अख्खे कुटुंबही कोरोनाच्या कचाट्यात सापडले.
मतदान कर्मचारी म्हणून आपले कर्तव्य पार पाडून घरी परतलेल्या शिक्षकाच्या घरात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे, अवघ्या चार दिवसांत हसतं खेळतं कुटुंब उद्धवस्त झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मृत शिक्षकाचे नाव प्रमोद वसंतराव माने (५०) असून ते जगधनेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत होते. यांची पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदान कर्मचारी म्हणून ड्युटी लावण्यात आली होती.
त्यासाठी त्यांनी १७ एप्रिल रोजी आसबेवाडी याठिकाणी निवडणूक कर्मचारी म्हणून बारा तास ड्युटी निभावून घरी गेले. घरी आल्यानंतर दोन-तीन दिवसांतच माने यांच्यासह त्यांचे वडील वसंतराव माने, आई शशिकला माने आणि मावशी जयश्री कोडग यांनाही कोरोनाची लागण झाली.
या सर्वांवर सांगोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले. या सर्वांवर मुंबईत उपचार सुरू असताना प्रमोद माने यांचा ४ मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर लागोपाठ मावशी जयश्री कोडग (६८), वडील वसंतराव माने (७५) तर प्रमोदची आई शशिकला माने ( ७०) यांचे निधन झाले.
एकाच कुटुंबातील चार जणांचा एकामागून एक निधन झाल्यानं माने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर गावात अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.