अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुकांना राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांनी परवानगी दिली आहे.
या परवानगीनुसार 15 फेब्रुवारीपासून टप्प्या टप्प्याने या निवडणुका घेण्यास प्राधिकरणाने कळविले आहे. वर्षभरात सहा टप्प्यात या निवडणुका होत असून जिल्ह्यातील 1916 संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
त्यासाठी जिल्ह्याचा निवडणूक आराखडा तयार करण्याचे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांना दिले आहेत. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचा कार्यकाल पूर्ण झालेला आहे.
करोनामुळे सुरूवातीला 18 मार्च 2020 व नंतर 17 जून, 28 सप्टेंबर अशी तीन वेळेस तीन-तीन महिन्यांची मुदतवाढ सर्व सहकारी संस्थांना मिळाली होती. ही मुदतवाढ 31 डिसेंबर 2020 रोजी संपुष्टात आली होती.
यानंतर 31 मार्च 2021 पर्यंत निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. परंतू, 16 जानेवारीला सदरचा आदेश रद्द केला होता. त्यानुसार सरकारच्या सहकार खात्याने मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.
15 फेब्रुवारीपासून टप्प्या टप्याने या निवडणूका होणार आहे. कोरोनामुळे या सूचनांचे पालन अनिवार्य असणार निवडणूक काळात सामाजिक अंतर राखणे,
मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रीनींग इ. उपाययोजनांचा अवलंब करावा, तसेच करोनाबाबत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.