अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- कोरोना ची लाट ओसरत असल्याने आता जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सर्व बाजारपेठा सुरू झाले आहेत. पाठोपाठ आता जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळची लेणी यासह विविध पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी गुरुवारपासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
दरम्यान पर्यटन स्थळे खुली होणार असले तरी भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील धार्मिकस्थळे बंद राहतील. औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लेणी पाहण्यासाठी परदेशी पाहुणे येतात. वर्ष-दीड वर्षाच्या जागतिक लॉकडाउनमुळे परदेशी पर्यटक येत नाहीत.
त्यामुळे देशी पर्यटकांच्या जीवावर आणखी किती आर्थिक उलाढाल होईल. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वेरुळ, अजिंठा लेणीबरोबरच दौलताबादच्या किल्ला, असा प्रवास पर्यटक करीत असतात. शहरातील पर्यटनासही त्यामुळे चालना मिळत होती.
आता दुसऱ्या लाटेनंतर पुन्हा एकदा पर्यटनस्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जागतिक वारसा असणारी पर्यटनस्थळे सुरू करण्यास भारतीय पुरातत्व विभागाने १५ जून पर्यंत मज्जाव केला होता.
मात्र, रुग्णसंख्येचा एकूण आढावा घेतल्यानंतर पर्यटन स्थळे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पर्यटनस्थळी सफाई, सुरक्षा आदीची काळजी घ्यावी, असे करताना करोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही कळवण्यात आले आहे.