तहसीलदार देवरेंच्या विरोधात उतरले पारनेर तहसीलचे कर्मचारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :-पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे विश्वासात न घेता काम करत असल्याने त्यांच्या सोबत काम करणे शक्य नाही त्यामुळे त्यांच्या विरोधात बेमुदत काम बंदचा इशारा पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे .

याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांना पाठवण्यात आले आहे, पारनेर तहसील कार्यालयातील 41 कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह सर्व संबंधितांना निवेदन पाठवून एक तर आमची तालुक्याबाहेर बदली करा किंवा देवरे यांची पारनेरहून बदली करा, अशी मागणी केली आहे.

मागणीचा विचार न झाल्यास 25 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान यामुळे आ. निलेश लंके यांच्याविरोधात तक्रार करणार्‍या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधातील चौकशी अहवाल उजेडात आल्यानंतर अडचणीत सापडलेल्या देवरे यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे.

तहसीलदार देवरे या पारनेर येथे रूजू झाल्यानंतर त्यांच्यात तसेच कर्मचार्‍यांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. त्याविरोधात कर्मचार्‍यांनी तक्रार केल्यानंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच आ. लंके यांनी करोेना स्थितीमुळे प्रशासनावर ताण आहे. कर्मचार्‍यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतरही देवरे यांचा त्रास सुरूच राहिल्याने कर्मचार्‍यांमधील संताप पुन्हा उफाळून आला आहे. देवरे या राजकियदृष्ट्या सक्रिय असल्यासारख्या वागतात. त्यामुळे खालच्या कर्मचार्‍यांना त्याच्या बर्‍यावाईट परिणामांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे सर्व 41 कर्मचारी पारनेर तालुक्यात काम करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत.

या गोष्टीचा विचार करून एकतर आम्ही सर्व कर्मचार्‍यांची तालुक्यातून बदली करावी किंवा तहसीलदार देवरे यांची पारनेर येथून बदली करावी, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. कर्मचार्‍यांच्या मागणीचा विचार न झाल्यास 25 ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24