अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- गोदावरी नदीपात्रात मागील वर्षीही एप्रिलपर्यंत पाणीसाठा होता. यामुळे नदीकाठासह परिसरात पीक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली होती.
यंदाही तीच परिस्थिती आहे 231 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या वसंत बंधार्यात फेब्रुवारीअखेरपर्यंत चांगला पाणीसाठा होता.
गेल्या पंधरा दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे बाष्पीभवन होण्याची क्रिया जलदगतीने होऊन पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बंधार्याजवळील खडक दिसत आहे.
जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्यामुळे व विहिरीची पाणीपातळी टिकून असल्याने यंदा खरिपाचे उत्पादन समाधानकारक आहे. परंतु वीज वितरण कंपनीने थकबाकीच्या कारणाने अनेक शेतकर्यांची वीजतोडणे सुरू करून डिपीही बंद करणे चालू केले आहे.
यामुळे शेतकरी वर्गात नाराजी दिसून येत आहे. नदीपात्रातील पाणी कमी होऊ लागल्याने नदी पात्रातील नैसर्गिक साधन संपतीचे मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून नुकसान होत आहे.
त्यामुळे भूगर्भाच्या पाणी साठ्यावर परिणाम होऊन भूजल पातळी कमी झाली. त्याचा परिणाम शेतकर्यांच्या विहिरीच्या पाण्याची पातळी कमी झाली; परंतु यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यामुळे नदी पात्रासह विहिरीच्या पाण्याची पातळी समाधानकारक आहे.
परंतु काही प्रमाणात गोदापात्रातील पाणी कमी झाल्याने नैसर्गिक साधन संपत्तीचे साठे उघडे पडत आहेत. काही महिन्यांपूर्वी शासनाने नदी पात्रातील वाळूचे लिलाव करण्याचे आदेश काढले होते, याचे पुढे काय झाले अशी नागरिकांत चर्चा आहे.