अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण यांचा शोध ४८ तासांनंतरही लागलेला नाही. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.
पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार केले आहे. ते सगळीकडे पाठवण्यात आले आहे. हिरण हे श्रीरामपूरमधील आपल्या घरी येत असताना सोमवारी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान बेपत्ता झाले. त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद मंगळवारी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली. हिरण यांनी नेहमीप्रमाणे आपले गोदाम बंद केले.
हिशेबाच्या वह्या व रोख रक्कम घेऊन दुचाकीवरुन ते घरी निघाले. मात्र, घरी पोहोचलेच नाहीत. बेलापूर-नगर बायपासवरील तलाठी कार्यालयाशेजारी त्यांची मोटारसायकल उभी असलेली आढळली.
दरम्यान, चौकशी केली असता श्रीरामपूरकडे जाणाऱ्या मारुती व्हॅनमध्ये एका व्यक्तीला बळजबरीने कोंबून नेले जात असल्याचे काहींनी पाहिले असल्याचे सांगण्यात आले. ती व्यक्ती आरडाओरड करत होती. त्यानंतर पोलिसांनी या भागातील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन मारुती व्हॅन श्रीरामपूरकडे जाताना दिसल्या.
काहींनी एक मारुती व्हॅन रोडवर उभी असल्याचे पाहिले. एकजण व्यापारी हिरण यांच्या दुकानाच्या आसपास उभा होता. तथापि, तोंडावर मास्क असल्याने त्याची ओळख अजून पटू शकलेली नाही. त्याच्या ऐकिव वर्णनावरून पोलिसांनी संशयित व्यक्तीचे रेखाचित्र तयार केले असून ते जारी केले आहे.
सीसीटीव्हीत दिसलेल्या मारुती व्हॅनची पोलिसांनी चौकशी केली असता काहीही निष्पन्न झाले नाही. काही संशयितांचीही पोलिसांनी चौकशी केली, मात्र सबळ पुरावा मिळू शकला नाही. सर्व बाजूने पोलिस तपास करत असून ठिकठिकाणी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.