अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही सरासरीच्या 98 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याप्रमाणे यंदा वेळे आधी दोन दिवस मान्सून दाखल झाला.
जून महिन्यात भरपूर पाऊस होईल, असे वाटत असल्याने मशागत करुन तयार झालेल्या रानात सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसावर शेतकर्यांनी कपाशी, सोयाबीन, बाजरी, मका, तूर, मूग, कडवळ आदी पिकांची पेरणी केली.
अधूनमधून येणार्या रिमझिम पावसाने ही पिके उतरुन आली. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. एखाद्या पावसाचा अपवाद वगळता संपूर्ण जून महिना कोरडाच गेला. आता जुलै सुरु झाला.
परंतु जुलैची सुरुवात देखील निराशाजनकच झाली आहे. पिके पाण्यावर आली आहेत. आज पाऊस होईल, उद्या पाऊस होईल. या आशेवर शेतकरी जगत आहेत. देशात जवळपास चांगला पाऊस पडेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले होते.
चांगली भविष्यवाणी आल्यावर खूष होऊन खरीपासाठी शेतकऱ्यांनी मोठी तयारी केली होती. नांगरण केली प्रसंगी कर्ज काढून बी-भरण्याची व्यवस्था लावली. खरीप पिकांच्या भरवशावर पुढील आर्थिक गणिते मांडली होती.
राज्यातील बहुतांश भागात पुन्हा पावसाने हुलकावणी दिली. सुरुवातीला पेरणीसाठी पाऊस झाला, शेतकऱ्यांनी पेरणी उरकली, त्यानंतर मात्र तो गायब झाला. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. पावसाचा मोठा पडलेला खंड याचा या खरीप पिकांना फटका बसला आहे. पेरणीला महिना उलटून गेला आहे.
तरी देखील पाहिजे असा दमदार पाऊस न झाल्याने खरिपाच्या पिकांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास खरीप पिकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.
सततचा दुष्काळ, त्यानंतर झालेली अतिवृष्टी व आता सुरु असलेल्या करोना महामारीमुळे पडलेला लॉकडाऊन, उसाची न मिळालेली एफआरपी, इंधन दराने पार केलेली दरवाढ, आकाशाला भिडलेली महागाई
या सर्वामुळे शेतीची पुरती वाट लागलेली असतांना लॉकडाऊन नंतर सर्व संकटावर मात करत पुन्हा पेरणी केली. पण नशीब तिथही आडव पडलं. निसर्गाने रंग दाखवयाला सुरुवात केल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे.