अहमदनगर Live24 टीम, 16 जून 2021 :- करोना महामारीच्या काळात महावितरणने भरंसाठी वीजबिलांनी आधीच शेतकऱ्यांची छळवणूक केली आहे.
यातच बळीराजाने बिले भरूनही विद्युत रोहित्र दिले जात नसल्याने भाजपच्या वतीने कोपरगाव येथे वीज मंडळाच्या अधिकार्यांना जाब विचारत तातडीने रोहित्र बसवून देण्याची मागणी करून कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कोपरगाव येथील महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी उपस्थित सहायक अभियंता दिनेश चावडा यांना मतदार संघातील विद्युत रोहित्राअभावी होत असलेल्या नुकसानासंदर्भात धारेवर धरले.
यावेळी विविध गावांतील शेतकरी बांधव उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या, सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकरी बांधवांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. करोना सारख्या महामारीच्या संकटात अनेक कुटुंंबांना आर्थिक फटका बसला आहे.
सध्या पावसाने ओढ दिली असून विहिरीच्या पाण्यावर जनावरांच्या चार्यांसह इतर पिकांची लागवड केली आहे. परंतु वीज वितरण कार्यालयाच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहेत. त्याचप्रमाणे वारंवार वीज बिले भरण्याची मागणी करून मन:स्ताप देण्याचे काम केले जात आहे.
बिले भरूनही विद्युत रोहित्र बसविण्यास टाळटाळ केली जात असल्याचा आरोपही कोल्हे यांनी यावेळी केला. ही अन्यायकारक भूमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही.
विद्युत रोहित्र तातडीने दुरूस्त करून शेतकर्यांना न्याय द्यावा, अन्यथा वीज वितरण मंडळाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सौ. कोल्हे यांनी दिला.