शेतकर्‍यांना पाणीपट्टीचे पैसे भरुन देखील रितसर पावत्या नाही…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- जायकवाडी सिंचन प्रकल्पाच्या पट्ट्यातील शेतकर्‍यांना पाणीपट्टीचे पैसे भरुन देखील रितसर पावत्या मिळत नसल्याबाबतच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. यावेळी जायकवाडी प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी अविनाश पांडुळे यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या.

तसेच या शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आल्यास अपण संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाई करु असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले. जायकवाडी सिंचन प्रकल्पाच्या पट्ट्यातील शेतकर्‍यांना अधिकारी व कर्मचारी वसुलीच्या नावाखाली त्रास देतात. जायकवाडी लाभधारक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांंची अधिकारी व कर्मचारी लूट करतात.

या गावांमध्ये ते फिरुन पाणीपट्टीच्या नावाखाली रकमा जमा करतात. नक्की थकबाकी किती तेही सांगत नाहीत व जेवढी रक्कम घेतली तेवढ्याच्या पावत्या देत नाहीत. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना या पट्ट्यात फिरण्यास बंदी घालण्याचा इशारा नेवासा येथील समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण घुले यांनी दिला होता.

याची दखल घेवून जायकवाडी सिंचन प्रकल्पाच्या पट्ट्यातील भालगाव, गोधेगाव या गावांमधील शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांनी नुकतीच भेट दिली.

यावेळी उपविभागीय अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तरी अनेक शेतकर्‍यांच्या भेटी होवू शकल्या नाहीत त्यामुळे मंगळवारी या भागात पुन्हा येवून शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेवून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करू, अशी ग्वाही पांडुळे यांनी यावेळी शेतकर्‍यांना दिली.

अहमदनगर लाईव्ह 24