…तर अत्यावश्यक सेवाही बंद करा : मुख्यमंत्री

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे.

अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलिस यंत्रणेला दिले.

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत.

मात्र याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे असे दृश्य दिसता कामा नये. अन्यथा, त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

विवाह समारंभ हे करोना संसर्गास मोठ्या प्रमाणावर जबाबदार असल्याचे लक्षात आले आहे, त्यादृष्टीने यावेळेस सर्व नियम व्यवस्थित पाळले जात आहेत किंवा नाहीत हे जिल्हा व पोलीस प्रशासनाने पाहावे, असे ठाकरे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचे उत्परिवर्तन झालेले आपल्याकडील नमुन्यांमध्ये आढळले आहे. गेल्या वर्षीपेक्षा संसर्गाचा वेग खूप जास्त आहे, तरुण पिढी जास्त संक्रमित झाली आहे. प्राणवायू उपलब्ध करून घेण्यासाठी आपण युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहोत.

जिल्ह््यांच्या डॉक्टर्सनी बदललेल्या उपचार पद्धतींबाबत काय करायचे ते राज्याच्या तज्ज्ञ कृती दलाकडून समजून घ्यावे. प्राणवायूचा उचित व योग्य वापर तसेच रेमडेसिविरसंदर्भात काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील.

तसेच आपण उभारलेल्या जम्बो सुविधा या येणारा पावसाळा, वादळे लक्षात घेऊन सुरक्षित आहेत किंवा नाही ते तपासून घ्यावे. सर्व रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण त्वरेने पूर्ण करून घ्यावे, यात कोणताही निष्काळजीपणा ठेवू नये.

सूक्ष्म आणि लहान प्रतिबंधित क्षेत्रांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्याची चांगली अंमलबजावणी होईल, हे पाहताना आपला मुख्य उद्देश हा करोनाची संसर्ग साखळी तोडणे हा आहे हे लक्षात ठेवावे.

कुठलाही अतिरेक किंवा विसंगत कृती करू नये, कोणतीही शंका असल्यास मंत्रालयाकडे तातडीने मार्गदर्शन मागावे, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24