अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- उत्तर प्रदेश सरकारला त्यांच्या पक्षाच्या आमदारावरही नीट उपचार करता येत नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयाला अनेकदा फोन करुनही कोणी फोन उचलत नाही.
धन्य आहेत योगीजी आणि धन्य आहेत मोदीजी, असे कोरोनाने मृत्यू झालेल्या बरेलीमधील नवाबगंज मतदारसंघाचे भाजपाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा मुलगा विशाल याने म्हटले आहे. भाजपाचे आमदार केसर सिंह गंगवार यांचा नुकताच करोनामुळे मृत्यू झाला.
करोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी मृत्यूच्या दोन दिवस आधी लिहिलेलं एक पत्र आता व्हायरल होत आहे.
मृत्यूच्या दोन दिवस आधीच केसर यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी मॅक्स रुग्णालयामध्ये आपल्यासाठी बेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली होती. मात्र या पत्रानंतरही त्यांना मॅक्स रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध झाला नाही.
बरेली प्रशासनाने त्यांना नोएडा येथील यथार्थ रुग्णालयामध्येच राहण्यास सांगितले. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर केसर यांच्या मुलाने आता उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेविरुद्ध एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रश्न उपस्थित केला.
केसर सिंह हे करोनामुळे मरण पावलेले उत्तर प्रदेशमधील भाजपाचे तिसरे आमदार आहेत. यापूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन भाजपा आमदारांना प्राण गमावावा लागला आहे. केसर सिंह यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.