अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-आतापर्यंत मोठ्या व्यक्तींना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आले आहे. परंतु आता लहान मुलांनाही कोरोनाचा विळखा बसत आहे. मुलांना होत असलेल्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणांसह मुलांच्या पालकांचीही काळजी वाढली आहे.
मुंबईत लहान वयोगटातील मुलांमध्ये 55 टक्के, तर मुलींमध्ये 45 टक्के कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत.
मुंबई महापालिकेने संपूर्ण वर्षभराच्या अनुषंगाने कोरोनाबाधित रुग्णांची 0 ते 9, 10 ते 19, 20 ते 29, 30 ते 39, 40 ते 49, 50 ते 59, 60 ते 69, 70 ते 79, 80 ते 89 आणि त्यावरील वयोगटाप्रमाणे नोंद केली आहे.
त्यापैकी 50 ते 59 वर्षे वयोगटात 78,471 एवढे रुग्ण आहेत. त्यापैकी पुरुषांचे प्रमाण 43,107 असून महिलांचे प्रमाण 35,311 इतके आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 0 ते 9 वयोगटात आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6,892 अशी नोंदवली गेली आहे. त्यात मुलांमध्ये 55 आणि मुलींमध्ये 45 टक्के इतक्या प्रमाणात कोरोना आढळला आहे.
तर 10 ते 19 वयोगटातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 17,549 अशी आहे. या आकडेवारीत मुलांचे प्रमाण 55 टक्के आणि मुलींचे प्रमाण 45 टक्के एवढे आहे. या दोन्ही वयोगटातील एकूण मृत्यूचा आकडा अनुक्रमे 17 आणि 32 टक्के आहे.
त्यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने नियमांचे पालन करा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 1 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,11,424 इतकी आहे.
तसेच एकूण मृतांची संख्या 11,755 इतकी आहे. या नोंदीच्या आधारे पालिकेने वर्गवारी केली आहे. कोरोना संदर्भात मुलांमधील संक्रमणाचा विचार करताना 0 ते 9 वर्षे वयोगटातील 6,892 मुलांचा समावेश आहे.
त्यापैकी मुलांची संख्या 3,791 आणि मुलींची संख्या 3,101 एवढी आहे. 10 ते 19 वर्षे वयोगटातील 17,549 रुग्णांमध्ये 9,140 मुले आणि 7,699 मुलींचा समावेश आहे. या दोन्ही वयोगटातील मृत्यू संख्या अनुक्रमे 17 आणि 32 अशी आहे.