अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु राष्ट्रवादीमधील फुटीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर अजित पवारांसोबत गेले. यात अहमदनगरमधील चार आमदारांचाही समावेश आहे. परंतु असे असले तरी अद्यापही अनेक ज्येष्ठ, बडे नेते शरद पवारांसोबत होते. परंतु नुकतेच निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर अनेकांत पुन्हा एकदा अस्वस्थता दिसायला लागली.
यातच आता अहमदनगरमधील ज्येष्ठ, अनुभवी, शरद पवार यांचे एकवेळचे सोबतचे विश्वासू असणारे श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी काल मुंबईत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे मुरकुटे यांचा कल अजितदादांकडे असल्याचे दिसून येते. म्हणजेच अहमदनगरमधील ‘ बडे नेतेही आता शरद पवारांऐवजी अजित पवारांकडे जाणार का? अशी चर्चा व्हायला लागली आहे.
मुरकुटे यांचे पुन्हा अजितदादांशी जुळणार सुत?
माजी आ. भानुदास मुरकुटे हे अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी काही काळ त्यांनी बरोबर काम केले. त्यानंतर अजित पवार हे राजकारणात आले. काही काळ अजितदादांशी मुरकुटेंचे जमले. नंतर काही वेळा खटके उडाले. परंतु, मुरकुटे यांची पवार कुटुंबियांशी नेहमीच जवळीक राहीलेली आहे. यापूर्वी मुरकुटे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल अशा तीन पक्षातून काम केलेले आहे.
नुकताच त्यांनी तेलंगणातील बीआरस पक्षात
प्रवेश केला होता. परंतु, नुकताच झालेल्या निवडणुकीत बीआरएसचा तेथे पराभव झाला, त्यामुळे आता मुरकुटे हे नेमके कोणाबरोबर जाणार? याची चर्चा सुरू होती. दरम्यान, मुरकुटे यांनी आपली स्वतंत्र आघाडी असल्याचे सांगितलेही होते. परंतु, काल मुरकुटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ. निलेश लंके, माजी आ. राहुल जगताप, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड, अशोकचे डायरेक्टर ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते. यावेळी मुरकुटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अशोक कारखान्याच्या कार्यक्रमासाठी येण्याचे निमंत्रण दिले.
अजित पवार यांनी मुरकुटे यांच्या निमंत्रणाचा मान राखत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अशोक कारखान्याच्या कार्यक्रमाला येण्याचे मान्य केले. जवळपास २६ फेब्रुवारीला अशोक कारखान्याच्या कार्यक्रमाला अजितदादा येतील, असे निश्चित मानले जाते. मुरकुटे आणि अजितदादा यांचे मध्यंतरी फारसे पटत नव्हेत. परंतु, कालच्या भेटीनंतर आणि अजितदादा यांनी मुरकुटे यांचे निमंत्रण स्विकारल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.