अहमदनगर Live24 टीम, 25 मे 2021 :- कोरोना महामारी ही केवळ जागतिक अथवा एखाद्या देशावरचे संकट नसून तो मानव जीवनावरचा मोठा आघात ठरला आहे.
गेल्या पंधरा महिन्यापासून त्याच्या प्रभावामुळे स्वास्थ्य, प्रकृतीसह आता मानसिकतेवरही परिणाम जाणवत आहे. या आरोग्याच्या आपत्ती पुढे व्यवस्था अपुऱ्या पडल्या आहेत.
आता लोकसहभागातून या मानवावरील संकटावर मात करावी लागेल. सध्याचा काळ केवळ सेवा धर्म करण्याचा आहे. त्या भावनेतूनच एकमेकांना सावरावे लागेल, असे प्रतिपादन संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले.
अॅड. ढाकणे यांनी समाज माध्यमाद्वारे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. ढाकणे पुढे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दोन्ही तालुक्यातील परिस्थिती अतिशय खालावली आहे.
मागील पंधरा महिन्यापासून आपण सर्वच ज्या अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करतोय याची कधीही कल्पना कोणी केली नसेल. शत्रू दिसत नसला तरी त्याचा हल्ला मात्र होतोय.
आणि तो परतवून लावण्यासाठी शासकीय यंत्रणाही अपुऱ्या पडत आहेत. लोकांमधील भावना व सहनशीलता संपत चालल्या असून मोठी विदारक अवस्था निर्माण झाली आहे. परंतु काळ आपली परीक्षा घेत असला तरी त्याला धीरोदात्तपणे सामोरे जावे लागेल. कोरोनाने आपल्या सर्वांनाच धडा दिला आहे.
नेहमी साधन, संपत्ती, सत्ता यामागे धावणारे आपण एका अदृश्य शक्तीपुढे इतके हतबल झालो आहोत की, कमावलेली सर्व प्रकारची संपत्तीही कामाला येत नाही.
मात्र संकटाच्या या काळात हार मानून चालणार नाही. त्यासाठी एकमेकांची साथ देणे गरजेचे आहे. आता यापुढे प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीला नवा आयाम द्यावा लागणार आहे. या काळात ज्यांनी हे शिकले तेच यापुढे कसल्याही संकटांना हिमतीने सामोरे जातील.