अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- सध्या ग्रामीण भागातील शेतातील पिके काढणीची कामे सुरू आहेत. अनेकांचे घर व शेती यात बरेच अंतर असते.
त्यामुळे दिवसभर शेतातील कामे करण्यासाठी घरातील सर्व सदस्य गेले असता घर बंद ठेवावे लागते. नेमका याच संधीचा चोरटे फायदा घेवून भरदिवसा चोरी करण्याच्या घटना घडत आहेत.
नुकतीच अशीच घटना पाथर्डी तालुक्यातील भवारवाडी रोड मीडसांगवी येथे घडली. याबाबत संकेत घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील मीडसांगवी येथील भवरवाडी रोडवर संकेत सुनील घोंगडे यांचे घर आहे. सध्या शेतात ज्वारीचे पीक काढण्याचे काम सुरू आहे.
त्यासाठी घरातील सर्वजण शेतातील ज्वारी काढण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. यात एक तोळ्याचे सोन्याचे गंठण,
एक तोळ्याचे सोन्याचा नेकलेस, ३ ग्रॅम वजनाचे कानातील झुंबर,२ नथ असा एकूण ६७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी संकेत घोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.