अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- आधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे आतमध्ये गेले आणि आता शिवसेनेचे उपनेते प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गुंडसेनेतील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जातील, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे यांच्यानंतर प्रदीप शर्मादेखील तुरुंगात जाणार असल्याचा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील घरावर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापा टाकला असून कारवाई सुरु आहे.
या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
सोमय्या म्हणाले, मनसुख प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होत असली तरी सचिन वाझे यांनी अनिल परब- प्रदीप शर्मा यांच्याबाबत वसुलीसंबंधी जी माहिती दिली आहे त्यानंतर अनिल परब यांच्या घरीही तपास यंत्रणा पोहोचणार असून त्यावेळी मला आश्चर्य वाटणार नाही.
उद्धव ठाकरेंची जी गुंडसेना आहे त्यातील सगळे एकामागोमाग एक जेलमध्ये जाणार आहेत. अनिल परब यांचा दापोली रिसॉर्ट घोटाळा जो काढला आहे त्यात सदानंद कदम त्यांचा पार्टनर आहे. सदानंद कदम याचा पार्टनर शिवसेनेचा शाखाप्रमुख असून त्यानेच मनसुखला मारण्यासाठी सचिन वाझेला वाहन दिलं होतं.
त्यामुळे तुम्ही हे सर्व धागेदोरे पहा कसे आहेत. ही सगळी उद्धव ठाकरेंची माफिया सेना आहे, असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. अंबानी यांना धमकी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी शर्मा यांचा संबंध असावा, असा संशय एनआयएला आहे.
शर्मा यांना बहुचर्चित रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैया हत्येप्रकरणी (बनावट चकमक) अटक झाली होती. सुमारे तीन वर्षे ते कारागृहात होते. मनसुख हत्येप्रकरणी एनआयएने अटक केलेला निलंबित पोलीस शिपाई विनायक शिंदे लखनभैया हत्या प्रकरणात सहआरोपी होता.
या गुन्ह्यातून शर्मा वगळता उर्वरित सर्व आरोपींना(शिंदेसह) न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. निर्दोष मुक्त झाल्यानंतर शर्मा यांनाही पुन्हा सेवेत घेण्यात आले. सध्या चर्चेत असलेले परमबीर सिंह ठाणे शहरात पोलीस आयुक्त असताना शर्मा यांच्याकडे तेथील खंडणीविरोधी पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी होती.