अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने राबविण्यात येत आहे. यातच जिल्ह्यात एक वेगळाच संतापजनक प्रकार सुरु झाला आहे.
सध्या काही नेते, कार्यकर्ते मंडळी लसीकरण केंद्रावर येतात. व्हीआयपीच्या नावाखाली आपल्या जवळच्यांना लस देण्यास भाग पाडतात.
आरोग्य विभागाने व्हीआयपी लसीकरण पद्धत बंद करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. दरम्यान श्रीगोंदा शहरासह तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वाढू लागला आहे.
यापुढे आरोग्य विभागही हतबल असून, सर्वसामान्य मात्र लसीकरणापासून वंचित राहत आहेत. सर्वसामान्यांना रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसी दिल्या जाणाऱ्या केंद्रांवर नागरिक अगदी पहाटेपासूनच रांगा लावतात. सामान्य नागरिक ऑनलाइन नोंदणी करतात.
आधार कार्ड घेऊन रांगेत उभे असतात. मात्र, लसीकरण केंद्रावर परिसरातील काही राजकीय मंडळी स्वत:ची यंत्रणा लावतात.
त्यामुळे गोंधळमय परिस्थिती होते. आरोग्य विभागातील कर्मचारी अधिकारी यांना सामान्य नागरिकांचा रोष पत्करावा लागतो.
सर्वसामान्यांना मिळणारी लस हि राजकीय हस्तक्षेपामुळे मोजक्याच लोकांना मिळते, यामुळे लसीकरण केंद्रावरील राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशी मागणी होत आहे.