अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्याबाजारात अडकलेले भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने व्हिडिओ चित्रीकरणाचा पेन ड्राईव्ह पुरावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनासह सादर करण्यात आला.
यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिव व शहराध्यक्ष सुशांत म्हस्के उपस्थित होते. एप्रिल महिन्यात कोरोना महामारीत रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत होती.
अशा परिस्थितीमध्ये भिंगार येथील म्हस्के हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ. किशोर मस्के व डॉ. कौशल्या म्हस्के यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करुन रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचे काम केले.
हॉस्पिटल मधील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन न देता इंजेक्शनची जास्त किमतीत विक्री केल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. सदर प्रकरणी हॉस्पिटलवर पोलीस प्रशासनाने छापा टाकून गुन्हा देखील दाखल केला आहे.
मात्र अद्यापि हे दांपत्य फरार आहे. सदर मेडीकलची सर्व जबाबदारी हॉस्पिटलचे मालक असलेले डॉक्टरवर आहे.सदर मेडिकल मधून रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असतानाचे चित्रीकरण झालेले आहे.
आमचे चुलते किशोर भिंगारदिवे डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व जास्त पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी मृत्युमुखी पडले.अशा पध्दतीने अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
सदर डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन व उपोषण करुन देखील न्याय मिळालेला नाही.
रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी देण्यात आलेल्या व्हिडिओ चित्रीकरणाचा पुरावा ग्राह्य धरुन संबंधीत म्हस्के हॉस्पिटलच्या डॉक्टर दाम्पत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
अन्यथा सोमवार दि.7 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.