अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यातील कांदालिलाव बंद आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असताना भाजीपाला, फळे, कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कांदालिलाव बंद ठेवून प्रशासनाने शेतकऱ्यांना महिनाभरापासून वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कांदालिलाव सुरू करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. दरम्यान बाजार समिती सुरू करण्यासाठी जे निकष लावले आहेत,
तेही कांदालिलावाबाबत दक्षता घेऊन राबविता आले असते. मात्र, थेट महिन्यापासून लिलावच बंद करून प्रशासनाने शेतकरी, व्यापारी व ग्राहक या तिघांचीही पिळवणूक केली आहे. यामुळे प्रशासनाविरुद्ध संतप्त भावना निर्माण झाली आहे.
याबाबत अकोले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे, की काही बाजार समित्या सुरू केल्या आहेत; परंतु कांदालिलाव अद्यापही बंद आहे. कांदालिलावात शेतकऱ्यांची गर्दी होते, त्यातून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असे सांगून प्रशासनाने लिलाव बंद ठेवले आहेत.
मात्र, त्यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सर्वांनाच कांदा साठवण्यासाठी चाळी व इतर पर्यायी व्यवस्था नाही. अचानक वादळ व वादळी पावसामुळे कांदा भिजल्यास मोठे नुकसान होऊ शकते. सध्या हातात पैसा नाही, कांदा असूनही तो विकता येत नाही.
परिणामी, आर्थिक अडचण होत आहे. कांदा हा अवकाळी पावसाने खराब होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती समजून घेऊन लवकरात लवकर सकारत्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.