अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आता शिक्षकांकडून वसूल केले जाणार आहे.
तसा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची चूक आता शिक्षकांना महागात पडणार आहे. हि चूक शिक्षकाला आर्थिक स्वरूपात महाग पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्वउच्चमाध्यमिक इयत्ता पाचवी व पूर्वमाध्यमिक (इयत्ता आठवी) यांची शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्टला झाली.
या परीक्षेला जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता पाचवीचे एक हजार ८५४, तर आठवीचे २७२ विद्यार्थी गैरहजर होते. या शिष्यवृत्तीची फी व शाळासंलग्नता शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरले जाते.
त्यामुळे शाळेतील अनुपस्थित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संबंधित शिक्षकांकडून वसूल करून ते जिल्हा परिषदेच्या खात्यात वर्ग करण्यात यावे,
असा आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी जारी केला आहे. हा आदेश जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.