अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघात पुन्हा खळबळ उडाली असून भाजपाचे नेते तथा कर्जत पालिकेचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
नामदेव राऊत यांच्या राजीनाम्यामुळे कर्जत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आपल्या सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीशी चर्चा झाल्याचे सांगत सहकार्यासह निर्णय घेऊ असे सांगितले.
यामुळे आगामी काळात कर्जतच्या राजकारणात भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नामदेव राऊत यांनी दिलेल्या राजीनाम्यामध्ये म्हटले आहे की, अनेक वर्ष भाजपाच्या विचारधारेप्रमाणे काम करत असतांना भरीव असे काम केले आहे. या काळात अनेक जीवाचे मित्र मिळाले असून खूप काही शिकण्यास मिळाले आहे.
भाजपात काम करत असतांना राम शिंदे, खा. सुजय विखे, शिवाजी कर्डिले, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, स्व. दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी अॅड. अभय आगरकर आदींचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. राम शिंदे यांच्या कामाबद्दल व त्यांनी सहकार्याबद्दल मी समाधानी असल्याचे सांगत दिलेल्या राजीनाम्याचा स्वीकार करावा, असे म्हटले आहे.
नामदेव राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सांगितले की, मी भाजपा पक्षात कोणावरही नाराज नाही.
राष्ट्रवादीच्या कामाची पद्धत समाधानकार असून राष्ट्रवादीशी आपली चर्चा झाली आहे. यामुळे सहकार्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. यामुळे नामदेव राऊत हे राष्ट्रवादी पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नामदेव राऊत यांनी भाजपात विविध पदावर काम करत शेवगाव पालिकेसाठी पक्ष निरिक्षक म्हणुन काम केलेले आहे. यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपाला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.