अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव शिवारातून एका व्यक्तीने थेट रुग्णासह रुग्णवाहिकाच पळवून नेल्याची धक्कादायक घटना काल रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे.
योगेश म्हाळू रोंगटे हा रुग्णवाहिका चालक असून सोमवारी पेशंट व त्याचे नातेवाईकाला पुणेकडे घेवून जात होता. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास घारगाव शिवारातील हाॅटेल लक्ष्मी येथे जेवणाचे पार्सल घेण्यासाठी तो काहीवेळ थांबला होता.
त्यावेळी पेशंटचे नातेवाईक हे देखील रुग्णवाहिकेतून खाली ऊतरले होते. त्याच वेळी नाट्यमयरीत्या एका व्यक्तीने पेशंटसह रुग्णवाहिकाच घेवून पोबारा केला. त्यांनतर नातेवाईकांनी तत्काळ घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली.
पोलिस निरीक्षक सुनिल पाटील, राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, हरिश्चंद्र बांडे यांनी घटनेचा तपास सुरू करून संगमनेर येथे ती रुग्णवाहिका ताब्यात घेतली.
याप्रकरणी घारगाव पोलिसांनी वैभव सुभाष पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे तपास करत आहे.