अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. तसेच दररोज जिल्ह्यात कोठेना कोठे मृतदेह सापडत असल्याच्या घटना घडत आहे.
नुकतेच घारगाव गावच्या हद्दीतील मुळा नदीपात्रात ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. शांताराम तात्याराव शिंदे (वय ४०,रा. खंदरमाळ ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान ही घटना बुधवारी सकाळी बारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबात अधिक माहिती अशी कि, शांताराम शिंदे हे सोमवारी (दि.१५) खंदरमाळ येथील राहत्या घरून घारगाव येथे कामानिमित्त गेले होते.
मात्र घरी न परतल्याने त्यांची पत्नी कल्पना (वय ३५) व मुलगा दिलीप (वय १५ ) हे शोध घेत होते. बुधवारी सकाळी नाशिक – पुणे महामार्गावर घारगाव येथील मुळा नदी पुलावरून काही नागरिकांना नदीत मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
या प्रकाराची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मुतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.
सदर व्यक्तीच्या मृत्यूचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.