अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथील गोदातीरावरील ग्रामस्थांचे ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात नागपंचमीच्या वार्षिक यात्रा महोत्सवाचे दिवशी रात्री दोनच्या सुमारास चोरी झाल्याने तमाम भाविक ग्रामस्थांनी सकाळी मंदीरासमोर तीव्र संतप्त भावना व्यक्त केल्या.
तालुका पोलिसांनी तातडीने चोरीचा तपास लावण्याची मागणी केली. खानापूर येथे गोदावरी नदीच्या काठावर पुरातन नागेश्वर मंदिर असून मंदिराचे जिर्णोद्धार करण्याचे काम ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हाती घेतले. मागील आठवड्यात श्रीगणेश, नागेश्वर (मुख्य) व भगवान शंकराचे मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
शुक्रवारी नागपंचमीचे दिवशी खानापूर पंचक्रोशीतील गावांसह दूरच्या जिल्ह्या-जिल्ह्यातून गळ्याला गंडमाळ आजार झालेले रुग्ण नागपंचमीस या मंदिरात दर्शन घेत पुजाऱ्याकडून गळ्यात गंडमाळ दोरी घालून जातात. या दोरीने रुग्णांचा आजार बरा होतो, अशी आख्यायिका आहे.
नागपंचमीच्या पूर्व संध्येला भाविक ग्रामस्थ मंदिराची साफसफाई विद्युत रोषणाई करून रात्री भजनाचा कार्यक्रम असतो. ग्रामस्थ भजनी मंडळांनी रात्री भजन करून घरी गेले. त्यानंतर भुरट्या चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मंदिरातील अत्याधुनिक सिस्टीम लाऊडस्पिकर एप्लीफायर मशिनसह चोरून नेला.
अंदाजे किंमत ४५ हजार रुपये आहे. पहाटे मूर्तीस्नान पुजेसाठी पुजारी विठ्ठल म्हस्के मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला.