शहरातील उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव द्यावे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-  शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची मागणी नरेंद्र मोदी आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन नरेंद्र मोदी आर्मीचे पारनेरचे तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक कार्यालयात दिले.

जिल्हा प्रशासनाने उड्डाण पूलास स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची भूमिका स्पष्ट न केल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (तिथीनुसार) जयंती दिनी 31 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून शहराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आयुष्यभर गोरगरीबांचे आश्रू पुसण्याचे व वंचितांचे प्रश्‍न सोडवण्याचे कार्य केले.

जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे योगदान ज्ञात आहे. शहरात उड्डाण पूल व्हावे ही त्यांची इच्छा होती. त्यांनी शेवट पर्यंत उड्डाण पूल होण्यासाठी केंद्र सरकारला वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

शहरातील उड्डाणपूल होण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या उड्डाणपुलास त्यांचे नाव द्यावे ही जनसामान्यांची मागणी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करुन शहरातील नियोजित उड्डाण पूलास माजी केंद्रीय मंत्री स्व. दिलीप गांधी यांचे नांव देण्याची मागणी नरेंद्र मोदी आर्मीच्या वतीने आंबेडकर यांनी केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24