अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- राज्य निवडणूक आयोगाने पंचवार्षिक मुदत संपलेल्या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहिर केला आहे.यात नगर जिल्ह्यातील ९ नगरपालीकांचा समावेश आहे.

प्रारूप प्रभाग रचनावर हरकती व सुनावणीची प्रकिया पार पडल्यावर याचा अभिप्रायासह अहवाल जिल्हाधिकारी राज्य निवडणूक आयोगास पाठविणार असून त्यानंतर राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना जाहिर करणार आहे.

साधारणपणे एप्रिलच्या ऐन उन्हात नऊ नगरपालिकांच्या निवडणूकीचे रण तापणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने काल मंगळवार रोजी नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, राहाता, देवळाली प्रवरा, राहुरी, श्रीरामपूर, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नऊ नगरपालिकांचा यात समावेश आहे. निवडणूक प्रभाग सीमा प्रसिध्दी, हरकती व सूचना मागविणे,

तसेच सुनावणी आदी कार्यक्रमांचा या समावेश आहे.प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन मार्च पर्यंत सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी दि. ७ मार्चपर्यंत प्रभागरचनेस मान्यता देणार आहेत. नागरिकांच्या माहितीसाठी दि.१० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिकांच्या वेबसाईटवर कार्यक्रम प्रसिध्द करण्याचे आदेश दिले आहेत.

दि. १० ते दि१७ मार्चपर्यंत हरकतीची मुदत आहे. जिल्हाधिकारी हरकती व सूचनावर दि. २२ मार्च रोजी सुनावणी करणार असून दि. २५ मार्चपर्यंत अभिप्रायासह राज्य निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी अहवाल पाठविणार आहेत. अंतिम प्रभागरचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून दि.१ एप्रिल रोजी जाहिर केला जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office