अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- मागील ऑगष्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यांनतर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने राज्याला झोडपलं.
दरम्यान आता राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. हवामान खात्याने नुकताच याबाबत नवीन अपडेट जारी केला असून पुढील चार ते पाच दिवसांत सर्वत्र गडगडाटासहीत पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
राज्यातील अनेक भागात पोषक हवामान झाल्याने पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी पाच दिवस राज्यात पाऊस धुमाकूळ घालणार आहे. असं हवामान खात्याने वर्तवलं आहे.
नुकतंच महाराष्ट्रात 20 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
त्याची तीव्रता पुढील 24 तासांत आणखी वाढणार आहे. त्याचबरोबर, काही तासांनंतर हे क्षेत्र ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
परिणामी महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.
तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, मराठवाडा, औरंगाबाद, बीड, परभणी याठिकाणी अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे.