अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- ‘रिझाइन मोदी’ हा हॅशटॅग आम्ही चुकून तात्पुरता ब्लॉक केला; मात्र भारत सरकारने आम्हाला तसे सांगितले म्हणून नव्हे.
आता तो पुन्हा बहाल करण्यात आला आहे’, असे फेसबुकच्या एका प्रवक्त्याने गुरुवारी एका निवेदनात सांगितले. मात्र त्याने याचा तपशील दिला नाही.
वृत्तांनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा एक हॅशटॅग बुधवारी फेसबुकने काही तासांसाठी ब्लॉक केला.
या हॅशटॅगचा शोध घेणाऱ्या वापरकर्त्यांना एक संदेश मिळत होता. अशा पोस्ट्स ‘येथे तात्पुरत्या लपलेल्या आहेत’, कारण त्यांतील काही मजकूर आमच्या सामुदायिक निकषांच्या विरोधात आहेत, असे या संदेशात म्हटले होते.
फेसबुक अधूनमधून निरनिराळ्या कारणांसाठी हॅशटॅग आणि मजकूर ब्लॉक करत असते. यापैकी काही मॅन्युअली केले जाते, तर काही आपसूक होते.
कोविड संसर्गाची दुसरी लाट हाताळण्याच्या मुद्द्यावरून देशातील आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या गुरुवारी १.८ कोटीहून अधिक झाली.