अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- संगमनेरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे अपहरण झाले असून याप्रकरणाचा अद्यापही काहीच धागा दोरा पोलिसांचा हाती लागलेला नाही.
यामुळे याचा निषेध म्हणून एकीकडे आज बेलापूरात बंद पुकारण्यात आला आहे, तर दुसरीकडे या गंभीर विषयाबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत निवेदन करताना बेलापूरचे व्यापारी गौतम हिरण यांच्या अपहरण घटनेचा प्रश्न विधानसभेच्या सभागृहात उपस्थित केला.
दरम्यान, हा प्रश्न सभागृहात उपस्थित होताच तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. तसेच पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी जलदगतीने तपास होऊन अपहृत हिरण यांची सुटका व्हावी आणि घटनेची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना ताब्यात घेऊन शिक्षा करून या कुटुंबाला न्याय देण्याची आग्रही मागणी केली.
या प्रकरणाची वाढती चर्चा व यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर उपस्थित होऊ लागलेले प्रश्न याला उत्तर देण्यासाठी आता पोलीस यंत्रणा देखील आक्रमक झाली आहे. नगरचे जिल्हा पोलीस प्रमुख स्वतः मनोज पाटील हे सायंकाळी आपल्या फौज फाट्यासह बेलापूर गावात दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली व साक्षीदारांशी चर्चा केली.
तसेच पोलिसांना आरोपींना शोधण्याचे आदेश दिले. गौतम हिरण यांच्या अपहरणा बाबतचा तपास सुरु असुन ग्रामस्था इतकी आम्हालाही काळजी आहे. तपासासाठी चार वेगवेगळी पथके तयार केली असून पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी ग्रामस्थांना सांगितले.
बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण बेपत्ता होऊन आतापर्यंत पाच दिवस झाले तरीही पोलीसांना त्यांचा ठावठिकाणा लागेना. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज 6 मार्च रोजी गाव बंदची हाक दिली आहे.तसेच या प्रकरणातील आरोपीना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.