अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :- मुळात सरकार असतं कसासाठी? अडचणीत मदत करण्यासाठी. मात्र, राज्यातील ठाकरे सरकार हे सावकारांपेक्षाही भयंकर आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत फडणवीस बोलत होते.
ते म्हणाले, कोरोना रोखण्याचा उपाय म्हणून कधी लॉक, कधी अनलॉक असा खेळ सुरू आहे. लॉकडाऊनसारख्या गोष्टी गरजेच्या असतात. पण ते करताना ज्यांचा रोजगार जातो, त्यांना किमान दिलासा म्हणून सरकारी तिजोरीतून दोन रुपये दिले पाहिजेत याचं भानही या सरकारला नाही.
कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांत तिथल्या सरकारांनी करोना काळात सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मदत केली.
वीज बिलं माफ केली. सवलती दिल्या. मात्र राज्यात काहीच दिलासा सरकारने दिलेला नाही. कोरोना काळात राज्य सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाहीच, उलट झिजिया कराप्रमाणे वीज बिलांची वसुली केली.
निवडणूक असल्यानं पंढरपूर, मंगळवेढ्यात वीज जोड तोडणे थांबवले आहे. पण निवडणूक झाल्यानंतर १८ तारखेला पुन्हा वीज जोड तोडण्यास सुरुवात होईल. तसं नाही झालं तर माझं नावच बदलून टाकेन, असेही फडणवीस म्हणाले.