Kopergaon News : बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश परिसरातील नागरिक भयभीत

Published by
Ahmednagarlive24 Office

Kopergaon News : कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून डाऊच खुर्द, जेऊर कुंभारी, चांदेकसारे, घारी आदी करून गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तत्परतेने पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.

(दि. १०) ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास डाऊच खुर्द येथील गोरख सोमाजी पुंगळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून एक शेळी जागीच ठार केली आहे.

अंदाजे आठ ते नऊ हजार रूपये किंमतीची विक्रीला आलेली शेळी ठार झाल्यामुळे गोरख पुंगळ या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. व दुसरी शेळी जखमी केली आहे. या घटनेने डाऊच खुर्द परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त होत नसल्याने जिनिंग प्रेसिंग संचालक शंकर गुरसळ, माजी सरपंच संजय गुरसळ तसेच जेऊर कुंभारी येथील सरपंच सुवर्णा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वन विभागाला वारंवार कळवून देखील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश येत आहे. फक्त वेगवेगळी कारणे देऊन चालढकल करण्यात वनविभागाचे अधिकारी धन्यता मानत असतील तर याचा काय उपयोग, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या, बकऱ्या लहान-लहान वासरे मृत्यूमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तसेच मानवी जीवाला पण भीती निर्माण झाली आहे. शेळ्या, बकऱ्या, पाळीव कुत्रे आदी प्राण्यांना बिबट्या आपले भक्ष्य करून खात असल्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office