अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी नवरा दीपक भीमराज कोळपे (वय-२७) याची बनावट नवरी उभी करून बनावट लग्न लावून त्याच्याकडून ०१ लाख ०५ हजारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी मालेगाव येथील आरोपी गणपत पवार संगीता जगताप, चित्रा कैलास अंभोरे, (रा.मनमाड), जयश्री शैलेश जाधव (नवरी) रा.औरंगाबाद, गीता कॊसरे, पूनम पवार, वर्षाबाई निकम (सर्व रा.नाशिक), भाऊसाहेब दोडके (एजंट) रा.ब्राम्हणगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणातील चौघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटल्याने अनेकांना विवाहासाठी मुली मिळत नाही. यामुळे आता लग्न जुळून देण्यासाठी एजंट तयार झाले असून ते इच्छुक वरांची फसवणूक करतानाच्या घटना अधून मधून उघड होत आहे.
अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यात कोळपेवाडी येथील मजुर दीपक कोळपे याच्या बाबतीत घडली असून त्याला लग्नासाठी मुलगी मिळवून देतो असे आश्वासन देऊन वरील टोळीने त्याला तब्बल १ लाख ०५ हजाराला गंडा घातला असल्याची घटना उघड झाली आहे.