अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते आकाश मनोहर जाधव यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण व पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. यावेळी संजय कांबळे, सुशांत म्हस्के, अशोक केदारे, दिपक गायकवाड, संकेत कळंबे, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.
आकाश जाधव विविध संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे. दि.20 फेब्रुवारी रोजी देवेंद्र भगवान शर्मा यांनी आकाश जाधव यांच्या विरोधात मारहाण करुन पैसे लुटल्याचा खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल केला.
दि. 20 फेब्रुवारी रोजी जाधव हे घटनास्थळी नसून ते वैयक्तिक कामानिमित्त बाहेर होते. त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध आहेत. यावरून जाधव हे घटनास्थळी उपस्थित नसताना शर्मा यांनी त्यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे.
या अगोदर ही आकाश जाधव यांच्याविरुद्ध शर्मा यांनी जाणीवपुर्वक खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पोलीस प्रशासनाने आकाश जाधव यांच्यावर दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्याचा तपास करावा व यामध्ये ते निर्दोष आढळल्यास त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.