अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे कुटुंबे 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्य रक्कमपासून वंचित असताना, सदर सानुग्रह सहाय्य रक्कम देण्याबाबतची कार्यपद्धती घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
कोरोना महामारीच्या भीषण संकटावर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सेवा अधिग्रहीत केल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आपल्या कुटुंबियांच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाच्या विविध सेवेत आपली सेवा देत आहे.
सेवा देताना अनेक शिक्षक कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली. तर यामध्ये काही शिक्षक कर्मचारी यांचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना वित्त विभागाचे शासन निर्णयानुसार देय असलेल्या
50 लाख रुपये सानुग्रह सहाय्य रक्कम देण्याबाबतची प्रक्रिया प्रलंबित आहे. या प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक कर्मचार्यांचे कुटुंबे 50 लाख रुपयांचे सानुग्रह रक्कमपासून वंचित आहेत.
ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, मृत पावलेल्या शिक्षक कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना वार्यावर सोडणारी असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संवेदनशील व माणुसकीच्या भावनेने त्वरीत मृत्युमुखी पडलेल्या
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे कुटुंबे 50 लाख रुपयांचे सानुग्रह सहाय्याची रक्कम देण्याबाबतची कार्यपद्धती घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, राज्य महिला अध्यक्षा पूजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी आमदार भगवानआप्पा साळुंखे,
संजीवनीताई रायकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, सुनिल पंडीत, शिवनाथ दराडे आदी सर्व राज्यकार्यकारीणी सदस्य, शिक्षक परिषदेचे राज्यातील सर्व विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.