अहमदनगर Live24 टीम, 23 जून 2021 :- जिल्ह्याचे क्रीडाधिकारी शेखर पाटील यांची नागपूर विभागीय कार्यालयात क्रीडा उपसंचालक म्हणून बढती मिळाल्याबद्दल विविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षक व क्रीडा शिक्षक महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना, जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
क्रीडा आयुक्त यांचे आदेश कार्यालयास प्राप्त होऊन शेखर पाटील हे मंगळवारी कार्यमुक्त झाले असून, तालुका क्रीडाधिकारी प्रकाश मोहारे यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. वादग्रस्त क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या बदलीनंतर एक वर्षापूर्वी शेखर पाटील बुलढाणा येथून नगर येथे क्रीडा अधिकारी म्हणून हजर झाले होते.
त्यांनी विस्कटलेली घडी बसवण्याचे व क्रीडाप्रेमींच्या अपेक्षांना वास्तवरुप देण्याचे आवाहन समोर होते. अशा परिस्थितीत सर्व संघटना पदाधिकारी, क्रीडाप्रेमी यांना विश्वासात घेऊन मार्गक्रमण केले.
शेखर पाटील यांनी शासनाचा निधी ठराविक संस्थांपुरता मर्यादित न ठेवता अनेक शाळांना तीन लाखांचे क्रीडा साहित्य, क्रीडांगण विकास अनुदान, व्यायामशाळा अनुदान तसेच ओपन जीम उपलब्ध करून दिले. कोरोनामुळे स्पर्धा होऊ शकल्या नाही.
पण जिल्ह्याचा दौरा करून स्थानिक क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडा प्रमुख/संघटक यांचे मदतीने क्रीडा संकुलाचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांच्या कार्यकाळात केले गेले.
वादग्रस्त जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्या साहित्य वाटप, टेंडर या बाबत चौकशी समिती सोबत वास्तव अहवाल तयार करून क्रीड युवक सेवा संचलनालयास पाठवला.
जिल्हा क्रीडा संकुल येथे मोकाट फिरणारांना मासिक व दैनिक पासाचे शुल्क आकारून चाप लावला. संकुलात प्रवेश करणारांच्या नोंदी ठेवल्या जाऊन खेळाडूंना मैदान खुले केले. क्रीडा विकास व सुविधा निर्मितीसाठी खेळ संघटना व शारीरिक शिक्षक संघटना पदाधिकार्यांच्या सूचनांना प्राधान्य देत,
शासन योजना सर्वसामान्य खेळाडू, क्रीडाप्रेमीसाठी उपलब्ध करून दिल्या. क्रीडा कार्यालयांतर्गत सहकार्यांना विश्वासात घेत विस्कटलेली घडी बसवत कामाचे कौतुक करून कमी मनुष्यबळात काम करण्याचे तंत्र व मंत्र जणू देत नवा आयाम निर्माण केला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शेखर पाटील यांची नोकरीची सुरुवात तत्कालीन क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्या जिल्ह्यात झाली, तर उपसंचालकाची बढती विद्यमान क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या जिल्हयात झाली आहे. शेखर पाटील यांच्या नियोजनबद्ध कामामुळे एक कामसू अधिकारी म्हणून परिचय आहे.
अहमदनगर येथून बढती मिळाल्याबद्दल सर्व संघटनांच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रा.सुनील जाधव, शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर,
माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे राज्य सचिव महेंद्र हिंगे,
घनःशाम सानप, भाऊसाहेब जिवडे, शिवाजी नरसाळे, नंदकुमार शितोळे, शिरीष टेकाडे, दिनेश भालेराव, यांच्या उपस्थितीत सत्कार करून निरोप देण्यात आला.