शेतकऱ्याने पेटविला दीड एकर ऊस; जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-मुळा कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोडही देत नसल्याने हनुमानवाडी येथील ॠषीकेश वसंत शेटे यांनी गट नंबर ५६६ मधील दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले.

महाविकास आघाडी सरकार व संबंधित मंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी परीसरातील शेतकरी,पोलिस बंदोबस्त व बघ्यांची गर्दी जमा झाली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच नेवासा तालुक्यातील करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी शेतातच अडीच एकर उभा ऊस पेटवून दिला होता.

मुळा सहकारी साखर कारखान्याने उसाला तोड दिली नाही, असा आरोप करत या शेतकऱ्याने पर्यायच उरला नाही म्हणून हे पाऊल उचलले होते.

‘विधानसभा निवडणुकीत मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या विरोधात काम केल्याने कारखान्याने आमचा ऊस घेतला नाही,’ असा आरोप या शेतकऱ्याने केला होता.

त्यानंतर सोशल मीडियावर स्टंटबाजीचा कलगीतुरा रंगला होता. दडपण आणून उसतोड करण्याचा हा प्रयत्न असून शेतकी विभाग त्यास बळी पडला तर आम्हीही उस पेटवून देवू, असे खरवंडी, चांदे व सोनई गटातील शेतक-यांनी सांगितले.

मुळा कारखाना करीत असलेल्या अन्यायाचा निषेध म्हणून महाविकास आघाडी सरकार व मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करीत उसाचे पीक पेटवून दिले.

साखर आयुक्तांपुढे कैफियत मांडून उपयोग झाला नाही. पुढील आंदोलन आत्मदहनाचे असणार आहे, असे ॠषीकेश शेटे यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24