Farmer Success Story : शेतकऱ्याने केली मिरचीच्या ‘या’ वाणाची लागवड आणि मिळवले एकरी 3 लाख रुपये उत्पन्न! वाचा या वाणाची माहिती

Published by
Tejas B Shelar

Farmer Success Story:- आत्ताचे शेतकरी हे खूप शेतीच्या बाबतीत सजग असून कायम विविध माध्यमातून शेती विषयी वेगवेगळी माहिती मिळवत असतात. असे बरेच शेतकरी आपल्याला दिसून येतील की त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशा पिकांची शेती यशस्वी करून दाखवलेली आहे.

तसेच जे काही कृषी प्रदर्शने किंवा कृषी परिसंवाद आयोजित केल्या जातात त्या माध्यमातून देखील विविध ज्ञान मिळवून या ज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून शेतकरी भरघोस असे उत्पादन घेतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परंपरागत पिके आता काळाच्या ओघात नाहीसे झाले असून विविध फळबागा तसेच भाजीपाला पिकांच्या लागवडीतून शेतकरी आता आर्थिक उन्नती साधताना दिसून येत आहेत.

उपलब्ध क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन आता शेतकऱ्यांना मिळू लागले आहे. याच मुद्द्याचा विचार करून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असणाऱ्या सफियाबापूरवाडी या गावचे लक्ष्मण जाधव यांचा विचार केला तर यांनी मिरची पिकातून तब्बल एकरी तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. नेमकी त्यांनी कोणत्या मिरचीच्या वानाची लागवड केली होती व त्या वाणाच्या मिरचीचे उपयोग काय? इत्यादी बद्दल माहिती घेऊ.

मिरची लागवडीतून मिळवले येथे तीन लाख उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असणाऱ्या सफियाबापूरवाडी या गावचे लक्ष्मण जाधव त्यांच्याकडे सहा एकर जिरायती शेती असून ते प्रामुख्याने कांदा तसेच मका व कपाशीचे पीक घेतात. परंतु त्यांच्यामध्ये प्रयोगशीलता हा गुण असल्यामुळे ते कृषी प्रदर्शने व इतर माध्यमातून शेती विषयीची माहिती मिळवत असतात.

या त्यांच्या माहिती मिळवण्याच्या प्रयत्नातून त्यांना रेड पेपरीका या मिरचीच्या वानाची माहिती मिळाली व 2021 मध्ये त्यांनी लागवड केली. या मिरचीच्या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागल्यामुळे त्यांनी या वाणाच्या लागवडीमध्ये सातत्य ठेवले. याकरिता त्यांनी एका कंपनीसोबत बियाणे खरेदी ते मिरचीची विक्री इत्यादीसाठी करार केला असून कराराच्या माध्यमातून लक्ष्मण जाधव यांनी रेड पेपरीका मिरचीची बियाणे विकत घेत त्यापासून स्थानिक शेडनेट नर्सरीमध्ये रोपे तयार केली व मिरचीची लागवड केली.

लागवड करण्यासाठी त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला व एका एकर मध्ये 4.6×0.6 या अंतरावर एकरी अठरा हजार रोपांची लागवड त्यांनी केले. साधारणपणे पाच महिन्याच्या कालावधीमध्ये हे पीक घेतले जाते. ऑक्टोबर महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या मिरचीची जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन तोडे या माध्यमातून निघतात. त्यानंतर वाळलेली मिरची या कंपनीकडूनच ठरलेल्या दरानुसार खरेदी केली जाते.

लागवड ते काढणी खर्च किती?
ह्या मिरचीची लागवड ते काढणी असा सरासरी खर्चाचा विचार केला तर तो 80 हजार रुपये प्रति एकर इतका येतो. यामध्ये बियाणे तसेच बियाण्यांपासून रोप निर्मिती, शेत तयार करणे तसेच बेड पाडणे, मल्चिंग पसरवणे, ठिबक सिंचन तसेच नियमित आठ दिवसाला कंपनीच्या माध्यमातून मिरचीची पाहणी देखील केली जाते व त्यास आवश्यक घटकांची फवारणी सुचवली जाते व त्यानुसार हप्त्याला बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी होते. तसेच इतर खते व मिरचीची तोड इत्यादी मिळून एकरी 80 रुपये खर्च येतो.

रेड पेपरीका मिरची वाणातून किती मिळू शकते आर्थिक उत्पन्न?
या कंपनीसोबत असलेल्या कराराचा विचार केला तर त्यानुसार मिरची झाडालाच 30% पर्यंत लाल होऊन सुकते तेव्हा त्याची तोड केली जाते. अशा पद्धतीने या मिरचीच्या वानाच्या तीन तोड होतात. तोड झालेली सुकलेली लाल मिरची एकरी बारा ते तेरा क्विंटल मिळते.

यामध्ये चांगल्या दर्जाच्या मिरचीस 295 किलो व दुय्यम दर्जाच्या मिरचीला 270 रुपये किलो असा दर मिळतो. अशा पद्धतीने एकरी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न या मिरची मधून मिळते. झालेला खर्च वजा जाता एकरी अडीच ते तीन लाख रुपये हमखास उत्पन्न रेड पेपरीका मिरची वानातून मिळते.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com