Ahmednagar News : जोमात आलेली पिके पावसाअभावी सुकून जाऊ लागल्याने शेतकरी हतबल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : खरीप पिके पावसाअभावी वाया जातात की काय, या चिंतेत शेतकरी असल्याचे दिसून येत आहे.शेवगाव तालुक्‍यातील पूर्व भागासह संपूर्ण तालुक्‍यात खरीप हंगामातील शेतकऱ्यांचं पांढरं सोनं व नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, खरीपातील इतर पिकांकडे मात्र शेतकर्‍यांनी कानाडोळा केला असून, त्याची अल्प प्रमाणात पेरणी झाली आहे.

अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांनी सावकाराकडून व्याजाने व उसणे पैसे घेऊन मोला महागाची बी, बियाणे, औषधे व रासायनिक खते खरेदी करून पेरणी केलेल्या कपाशी पिकाची लहान लेकरा प्रमाणे देखभाल केली. त्यामुळे पिके ही जोमाने आली.

कारण सुरुवातीपासून जरी मोठा पाऊस झाला नसला तरी पिकास योग्य असा पाऊस झाल्यामुळे उगवून आलेली कपाशी पिके गत आठवड्यापर्यंत बर्‍यापैकी तग धरून होती. मात्र, या आठवड्यामध्ये कपाशी पिकांनी माना टाकल्या असून, जोमात आलेली पिके पावसाअभावी सुकून जाऊ लागल्याने ती आता वाया जाणार असल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्‍यात सध्या चालू हंगामात कुठेच नदी, नाले, ओढे वाहून जातील, असा मोठा पाऊस न झाल्याने जवळपास सर्वच विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

शेजारीच असणाऱ्या पैठण धरणात फक्त ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाच्या उजव्या कालव्या लगत मुंगी, हातगाव, पिंगेवाडी, खडके, मडके, खारमपिंप्री व कांबीसह गायकवाड जळगाव येथील गावांचे बऱ्यापैकी क्षेत्र ओलिताखाली येते.

मात्र, धरणातही पाणी नसल्याने मोठा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार आहे. तसेच पशुधन जगवण्याठीही चाऱ्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असून, पुढील काळात चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याची वेळ येऊ शकते.