अहमदनगर Live24 टीम, 5 जून 2021 :- कांदे भरण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या भरदिवसा घरात घुसून घरातील पावणे दोन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटयांनी लांबवले.
हि घटना श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील निंबोडीवाडी येथे घडली. बाळासाहेब लक्ष्मण शेटे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबत श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील बाळासाहेब लक्ष्मण शेटे हे निंबोडीवाडी येथे लगत रस्त्याच्याकडेला असलेल्या त्यांच्या शेतजमिनीमध्ये वस्ती करून राहतात.
काल ते सकाळी पत्नीसह शेतात कांदे भरण्यासाठी गेले होते. काम आटोपून ते दुपारी अडीचच्या सुमारास शेतातून परत आले.
यावेळी त्यांना घराचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले नंतर त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील सर्व साहित्याची उचकपाचक करून अस्तावस्त टाकले होते.
त्यामुळे त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने पाहिले असता ते चोरीला झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी श्रीगोंदा पोलिसांना माहिती देताच पोलिस तातडीने श्वानपथकासह घटनास्थळी हजार होत आजूबाजूला शोध घेतला.
या प्रकरणी शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनि अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास सपोनि तेजनकर हे करत आहेत.