राज्यातील शेतकरी संकटात ! दुबार पेरणीचं संकट..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- राज्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. गेल्यावर्षी खरीप आणि रब्बीत गेलेली पिकं, कोरोनामुळे पडलेले शेतमालाचे भाव आणि झालेल्या नुकसानीचं ओझं घेऊन यंदा शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली खरी… पण पावसानं पुन्हा दगा दिला.

आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. राज्यात जून अखेरपर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी पाहता राज्यातील 35 तालुक्यात जून महिन्यात सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे.

यातील नंदुरबार, नाशिक, धुळे, गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. राज्यात धान, कापूस आणि सोयाबीन ही खरीपातली प्रमुख पिके… मान्सूनच्या सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.

राज्यात जून अखेरपर्यंत झालेल्या पेरणीत सोयाबीन आणि धानाचं सर्वाधिक क्षेत्र आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं. त्यामुळे चिंतातूर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रूंचा महापूर आला आहे राज्यात आतापर्यंत सरासरी 40 टक्क्यांच्या जवळपास खरीप लागवड झाली आहे.

यात सर्वाधिक 56 टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे, त्यापाठोपाठ 47 टक्क्यांच्या वर कापसाची लागवड झाली आहे. पण बऱ्याच भागात गेल्या 12 ते 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं.

राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर काही जिल्ह्यात आणि बऱ्याच तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे.

अहमदनगर लाईव्ह 24