आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विकासाची नवी दिशा दाखवली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- अकोले तालुक्यात उपजावू जमीन यामुळे आदिवासी शेतकरी नेहमी आर्थिक अडचणीत असतात. परंतु गेल्या वर्षभरापासून तालुका कृषी विभागाने ‘आत्मा’च्या सहभागातून आदिवासी शेतकरी यांच्या साथीने विकासाची एक नवी दिशा दाखवली आहे.

दुर्गम व आदिवासी भाग म्हणून परिचित असलेल्या अकोले तालुक्यात सध्या शेतकरी शेतीच्या साह्याने आपली आर्थिक प्रगती करत आहे. दरम्यान कृषी विभागाने आदिवासी बांधवांना फणस गरे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

फणसाची उपलब्धता वाढावी म्हणून ८ गावांतील ३१ शेतकऱ्यांच्या सहकार्याने २७० कलमी फणसाची लागवड करण्यात आली आहे. आता ती झाडे ३ ते ४ फूट उंचीची झाली आहेत. १ फणस १००० रुपये उत्पन्न देऊ शकते.

चारोळीसारखे जंगली पीक येथील जंगलात रुजविण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी नंदुरबार तालुक्यातून अक्राणी येथून ११० रोपे गतवर्षी आणून ४ गावांतील १६ शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आहे. हीच चारोळी मोठी होऊन हिरड्याच्या बरोबरीने उत्पन्न देणार आहे.

त्याचबरोबर आसामी जांभळ्या भाताची ४ गावांत ६ एकर क्षेत्रावर लागवड करून या वर्षासाठी २८०० किलो बियाणे तयार झाले आहे. उन्हाळी नाचणीचा नावीन्यपूर्ण प्रयोग खडकी या गावातील २६ युवक शेतकरी यांनी ९ एकर क्षेत्रावर गटाच्या सहभागातून राबविला आहे.

रायवळ आंब्यापासून आमचूर तयार करण्याचे मोठे अभियान सुरू करण्यात आले. ५ गावांत तसे कार्यक्रम घेण्यात आले. नंदुरबार येथील दिवाळकी तुरीचे १० किलो बियाणे १९ गावांत देण्यात आले. या वर्षासाठी १२० किलो बियाणे तयार झाले आहे.

धामणवन येथील शांताराम बारामते यांनी उन्हाळी भात, ठिबकवर उन्हाळी नाचणी, शेततळ्यात मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन असे प्रयोग केले. या उन्हाळ्यात कलिंगड व मिरची यांची थेट बाजारात नेऊन विक्री केल्याने चांगला आर्थिक फायदा झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24