अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाने काल महत्वपूर्ण निर्णय घेतला, शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात संघाने गेल्या दोन महिन्यात चौथ्यांदा वाढ करीत शेतकऱ्यांना १६ ते २८ फेब्रुवारीपर्यंत ३० रुपये प्रतिलिटर तर १ मार्चपासून ३१ रुपये लिटर दर देण्यात येणार आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे चेअरमन माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केले आहे. अमृतसागर दूधसंघाची संचालक मंडळाची बैठक संघाचे चेअरमन वैभवराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. तीत संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यांनतर पिचड पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी संघाचे व्हाईस चेअरमन रावसाहेब वाकचौरे, संचालक विठ्ठल चासकर, भाऊपाटील नवले, शरद चौधरी, गोरक्ष मालुंजकर, रामदास आंबरे, विठ्ठल डुंबरे, सोपान मांडे, प्रवीण धुमाळ, सुभाष बेनके, बाळासाहेब नवले, रवींद्र हांडे, नंदा कचरे, रेखा नवले, जनरल मॅनेजर डॉ. सुजित खिलारी उपस्थित होते.
पिचड म्हणाले कि, गेल्या दोन महिन्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व पशुखाद्य, चारा, औषधे यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०२१ ला ३.५ व ८.५ दुधासाठी ३ रुपयांनी वाढ करून २६ रुपये खरेदीचा दर केला,
त्यानंतर लगेच १ फेब्रुवारीला २ रुपयांनी यात वाढ करून २८ रुपये दर वाढ केली, तर १६ फेब्रुवारीला त्यात आणखी २ रुपयांनी वाढ करून खरेदी दर ३० रुपये केला आहे. १ मार्च २०२१ पासून ३१ रुपये खरेदीने दूध घेणार आहोत, अशीही घोषणा पिचड यांनी यावेळी केली.
याचा लाभ अकोले तालुक्यातील १४० दूध संस्थांना होणार असून ७ हजार दूधउत्पादकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांनी संघालाच दूध द्यावे. जाहीर केलेल्या दरामध्ये संस्था कमिशन, अंतर्गत दूध वाहतूक, रिबेट हे अंतर्भूत नसून ते वेगळे असणार आहे
. दूधसंघाने करोनाच्या काळात लॉकडाऊनमध्येही दूधउत्पादक शेतकऱ्यांचे संकलन बंद न ठेवता जास्तीचा ३ ते ४ रुपये भाव जादा दिला आहे. आजपर्यंत कधीही शेतकऱ्यांचे देणे थकविलेले नाही, असे त्यांनी सांगितले.