शेतकरी आंदोलन : ‘या’ संघटना देशभरात २६ मे ‘काळा दिवस’ पाळणार..!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असून, शेतकरी संघटना, कामगार संघटना व किसान सभेच्या वतीने दि.२६ मे रोजी देशात व राज्यात काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे.

किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ.ॲड.सुभाष लांडे दिली. महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची नुकतीच ऑनलाईन बैठक घेतली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ.ॲड सुभाष लांडे होते. कॉ.नामदेव गावडे, कॉ.राजन क्षीरसागर, कॉ.बन्सी सातपुते, कॉ.हिरालाल परदेशी, कॉ.डॉ.महेश कोपुलवार, कॉ.नामदेव चव्हाण, कॉ.अशोक जाधव यांनी बैठकीत आपली मते मांडली.

सुमारे २६ जिल्ह्याातील ४५ प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. ॲड. लांडे म्हणाले की, २६ मे २०२१ रोजी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता सहा महिने होत आहेत. तर कामगारांच्या आंदोलनाला सुध्दा सहा महिने पूर्ण होत आहेत.

आणि योगायोगाने २६ मे २०१४ रोजी मोदींना पंतप्रधान पदाची शपथ घेण्याला सुध्दा ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या सात वर्षांत शेतकरी, शेतमजूर, कामगारांना मोदी सरकारने देशोधडीला लावले आहे. शेतकरी विरोधी तीन कायदे परत घ्यावेत.

शेतीमालाला किमान हमी भाव देण्याचा कायदा करावा यासाठी संपूर्ण देशव्यापी आंदोलनाला आता सहा महिने पूर्ण होत आहेत. म्हणून शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, विद्यार्थी,

युवक संघटना दि.२६ मे रोजी आपल्या घरावर काळे झेंडे लावून या कालावधीत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना आपल्या मागण्यांची निवेदने देतील. असेही ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24