अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनामुळे लॉकडाउन करावे लागले परिणामी सलग बंद असल्याने बाजारपेठ ठप्प झाल्याने त्याचा मोठा परिणाम सर्वसामान्य जनतेवर झाला आहे.
एकीकडे पशुखाद्याचे दर प्रचंड वाढले तर दुसरीकडे लॉकडाउनचे कारण पुढे करत दुधाचे दर कमी झाल्याने राज्यातील शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे.
त्यामुळे दूध दरवाढीच्या मुद्यावरून पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी किसान सभेच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अंबड गावातील अकोले येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
आज किसान सभा आणि संघर्ष समितीतर्फे दूध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरूवात झाली आहे. किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या उपस्थितीत अंबड गावातील अकोले येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे.
लॉकडाऊन पूर्वी दूधाला ३५ रूपये दर मिळत होता तो २० रूपये करण्यात आला आहे. तो पुन्हा ३५ रूपये करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करत आहे.
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे, असा आरोप या संघटनेने केला आहे.