अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पिके वाया गेली होती. यामुळे बळीराजा मोठा हवालदिल झाला होता.
यातच या पावसाचा सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे परिसरातील गावांमधील खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा परिसरातील सरपंच, उपसरपंच, शेतकऱ्यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन तहसीलदार शाम वाडकर यांना देण्यात आले. अतिवृष्टीने खरवंडी कासार परिसरातील मूग, उडीद, बाजरी, तूर, कपाशी, सोयाबीन या पिकांची नासाडी झाली. ७० टक्के जमिनीमध्ये पाणी साचून सर्व पिके सडली आहेत. बऱ्याच जमिनीतील पिके वाहूनही गेली.
त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे येथील शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू,
असा इशारा परिसरातील खरवंडी, काटेवाडी, ढगेवाडी, तुळजवाडी, भालगाव, मिडसांगवी या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी दिला आहे.