अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- शेतकर्यांचा वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा 14 डिसेंबरला महांकाळवाडगाव येथील शेतकरी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी घेतील, असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
शेतकरी संघटनेचे नेते निलेश शेडगे व इतरांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदन दिले आहे. दरम्यान श्रीरामपूर महावितरण कंपनीने दहा दिवसांपासून तालुक्यातील शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे.
यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. दरम्यान तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, महावितरण कंपनीने शेतकर्यांना 24 तास वीजपुरवठा देण्याचा निर्णय 2012 मध्ये घेतला होता.
सरकारने शेतकर्यांच्या बिलाचे सोळा तास वीजपुरवठ्याचे पैसे महावितरण कंपनीकडे तेव्हापासून जमा केले आहे. चालू वर्षाचे पैसेही महावितरण कंपनीला सरकारकडून मिळालेले आहेत.
मात्र, प्रत्यक्षात शेतकर्यांना केवळ आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. तसेच तोडण्यात आलेला वीजपुरवठा तातडीने जोडून द्यावा, अन्यथा सर्व शेतकरी जलसमाधी घेतील, असा इशारा देण्यात आला आहे.