Farming News : बाजारभाव ठरतोय शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ! टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming News : भाजीपाला पिकाकडे वळलेला तरुण शेतकरी वर्ग शेतमालाचा अस्थिर भाव, पिकांचे ढासळलेले नियोजन यामुळे अडचणीत आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. टोमॅटो, फ्लॉवर, मिरची, कोबी या सर्वच पिकांमध्ये शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या कांद्याच्या दरातही चांगलीच घसरण सुरू आहे.

मोठ्या प्रमाणावर खर्च करून प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या कांद्याला सध्या बाजारात अंदाजे ३५० ते ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. या भावाने शेतकऱ्यांनी पिकाच्या उत्पादनावर केलेला खर्चही वसूल होत नाही.

कधी भरमसाठ तर कधी कमी उत्पादन होत असल्याने भाजीपाला पिकांना हमीभाव नसल्याने अनेक वेळा शेतकयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला पिकाच्या उत्पादनविषयी समन्वय साधणे यासाठी शासनाच्या कृषी विभागाचा सहभाग तळागाळापर्यंत वाढणे गरजेचे आहे.

बाजारात सध्या कोबी, फ्लॉवर, टोमॅटो आदींसह सर्वच भाजीपाला मातीमोल भावाने विकण्याची तर प्रसंगी फेकून देण्याची वेळ बळीराजावर येत आहे. हजारो, लाखो रुपये खर्च करून हाती आले धुपाटणे, असे म्हणण्याची वेळ तरुण शेतकऱ्यांवर आली आहे.

टोमॅटो पिकाचा वाहतूक खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. अनेक दिवसांपासून घसरण सुरू असल्याने शेतीत पिकवलेले टोमॅटो जनावरांचे खाद्य बनले आहे. शेतीसाठी लागणारे खते, बी-बियाणे, औषधे, महाग झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मोठा भांडवली खर्च करून अतिशय कष्टाने पिकविलेला शेतीमाल अक्षरश: मातीमोल भावाने विकला जात आहे.

एका बाजूला उत्पादन खर्चामध्ये प्रचंड वाढ होत आहे. ट्रॅक्टरचे दर, मजुरी, चीजबिलामध्ये झालेली वाढ, वाहतुकीचा खर्चही अंगावर पडत असल्याने त्याला पिकात जनावरे सोडावी लागत आहेत. तर काहीजणांनी हाता- तोंडाशी आलेली पिके अक्षरश: उपटून फेकली आहेत.

पिकांच्या उत्पादनाविषयी शेतकयांनी समन्वय साधणे गरजेचे आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार वेगवेगळी फळपिके, तरकारी, नगदी, भाजीपाला पिकवणे आवश्यक आहे. सर्वांनी एकावेळी एकच पीक न निवडता वेगवेगळी पिके निवडली तर त्याचा फायदा सर्वांना होइल.