अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- चीनमध्ये कोरोना महामारीविरोधात युद्धपातळीवर सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत तब्बल १ अब्ज डोसचा टप्पा पूर्ण केल्याची घोषणा चीनने रविवारी केली.
जगभरात आतापर्यंत दिल्या गेलेल्या एकूण कोरोनारोधी डोसच्या तुलनेत हा आकडा तब्बल ३३ टक्के एवढा आहे. अमेरिकेने लसीकरण सुरू केल्यापासून शनिवारपर्यंत म्हणजे १५० दिवसांत ३० कोटी डोसचा पल्ला गाठला आहे.
त्या तुलनेत चीनची ही आकडेवारी वास्तविक असल्यास चीन जगात सर्वाधिक वेगाने लसीकरण करणारा देश ठरू शकेल. जगभरात विविध देशांतील लसीकरण मोहिमेदरम्यान, जवळपास अडीच अब्ज डोस दिले गेल्याची माहिती शुक्रवारी समोर आली होती.
त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानेही आपल्या देशातील लसीकरणाबाबतची आकडेवारी जगासमोर आणली आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील नागरिकांना आतापर्यंत तब्बल १ अब्ज डोस देण्यात आले;
मात्र यामध्ये एक डोस घेतलेले, तसेच दोन डोस घेतलेल्या लोकांची संख्या मात्र आयोगाने जारी केलेली नाही. जगात सर्वाधिक १४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या चीनने कोरोना महामारी रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला टप्प्याटप्प्याने सुरुवात केली होती.
सुरुवातीला या मोहिमेचा वेग कमी असला तरीही अवघ्या महिनाभरात ५० कोटी डोस देण्यात आले. यावरून चीनने लसीकरण मोहिमेची गती वाढवल्याचे स्पष्ट होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे, चीनने आतापर्यर्ंत सिनोव्हॅक, तसेच सिनोफार्मसह स्वदेशी बनावटीच्या सात लसींना मंजुरी दिली आहे. यापैकी दोन लसी तीन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना देण्यालाही चीनने नुकतीच मंजुरी दिलेली आहे.