काळिमा फासणारी एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात घडली आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला असून या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत पारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात राहणारी सदर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी अकरावीत शिकते. तिची आई मयत असून ४२ वर्षांचे वडील शेती करतात.
घरी एकटीच मुलगी असल्याचे पाहून वडिलांनी मे २०२३ ते १७ जुलै २०२३ पर्यंत या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. घरात कोणी नसताना राहत्या घरात व घरालगतच्या मोकळ्या जागेत नेऊन चाकूने जिवे मारण्याची धमकी देऊन वडिलांनी मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे.
घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला इतरांना ही गोष्ट सांगितली नाही. मात्र धाडस करत तिने ही गोष्ट मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीच्या नातेवाइकांनी पारगाव पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर या अल्पवयीन मुलीने पोलिसांपुढे येऊन आपबीती कथन केली. महिला सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल गुरव यांनी या मुलीशी संवाद साधला.पोलिसांनी या नराधम पित्याला जेरबंद केले आहे. यासंदर्भात पीडित मुलीने फिर्याद दिली आहे.